तभा वृत्तसेवा
पुसद,
VCA Inter-District T-20 Cup : विदर्भ क्रिकेट असोसिएशनद्वारा आयोजित आंतरजिल्हा टी-20 चषकावर यवतमाळ जिल्हा क्रिकेट संघाने विजयाची मोहर उमटवली आहे. विदर्भातील 10 जिल्ह्यांच्या चमूंमध्ये हे टी-20 सामने गडचिरोली आणि अमरावती या ठिकाणी खेळविण्यात आले.
या स्पर्धेत यवतमाळच्या चमूने सलग 6 सामने जिंकून चॅम्पियनशिप पटकावली. यवतमाळच्या संघाने उपांत्य फेरीमध्ये अमरावती येथे अमरावती संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना यवतमाळ व वर्धा, भंडारा संघात शनिवारी अमरावती येथे खेळला गेला. यात यवतमाळ संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली व वर्धा, भंडारा संघाला फलंदाजी करण्याची संधी दिली.
वर्धा, भंडारा संघाने 20 षटकांत 5 गडी गमावत 195 धावसंख्या उभी केली. वर्धा भंडारा संघाचा यश कदम याने 88 धावा केल्या. फलंदाजीसाठी उतरलेल्या यवतमाळ संघाने फक्त 19.4 षटकांत 6 खेळाडू गमावून 199 धावा काढून दणदणीत विजय मिळवला. यवतमाळ विजयी संघाचा कर्णधार अक्षय कर्णेवार याने 4 गदी बाद केले व तो ‘सामनावीर’ ठरला. या स्पर्धेत यवतमाळ संघाचा जगजोत सासन याने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक 278 धावा केल्या.
यवतमाळ संघाच्या विजयाबद्दल प्रशिक्षक रोहित चव्हाण, यवतमाळ जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळू नवघरे यांनी संघाचे कौतुक केले.