राष्ट्रीय लोकन्यायालयात 16 कोटींची वसुली

-7 हजार 430 प्रकरणे तडजोडीने निकाली -पाच व दहा वर्षे जुन्या 47 प्रकरणांत समझोता -सावरला चौघांचा संसार

    दिनांक :11-May-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Yavatmal News : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 7 हजार 430 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघाली असून तडजोड मूल्य 16 कोटींहून अधिक आहे. विशेष म्हणजे या अदालतीत 4 जोडप्यांचा संसार सावरला गेला असून पाच व दहा वर्षे जुनी 47 हून अधिक प्रकरणे समझोत्याने निकाली निघाली आहेत.
 
 
y11May-Adalat
 
 
 
राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशावरून शनिवार, 10 मे रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
झाडाला पाणी देऊन लोकन्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी न्या. नागेश न्हावकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. कुणाल नहार, जिल्हा वकील संघाचे सचिव मोहन गिरटकर तसेच सर्व न्यायीक अधिकारी, कर्मचारी, पक्षकार व इतर मंडळी उपस्थित होते.
 
 
राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये न्यायालयात प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर वेगवेगळ्या राष्ट्रीय बँका, विशेषत: जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत कराबाबतची वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.
 
 
ही प्रकरणे आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तसेच सर्व न्यायाधीशांनी परिश्रम घेतले. वेळोवेळी शासकीय अधिकारी, वकील, पक्षकार, संस्था, बँक अधिकाèयांच्या बैठका घेतल्या व त्यांना लोकन्यायालयाचे महत्व पटवून दिले.
राष्ट्रीय लोकन्यायालयात पक्षकारांना स्वेच्छेने व सामंजस्याने वाद अंतिमरित्या मिटविता येते याची खात्री पटल्यामुळे जिल्ह्यामध्ये 1,639 प्रलंबित व 5,791 वादपूर्व अशी एकूण 7,430 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. त्यांचे एकूण तडजोड मूल्य 16 कोटी 10 लाख 59 हजार 91 रुपये आहे.