शेतकरी हिताचे ३ कृषी कायदे परत आणा

कृषी कार्यकर्त्यांची मागणी

    दिनांक :18-Dec-2025
Total Views |
दर्यापूर, 
amravati-news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणलेले आणि विरोधी पक्षांसह हितसंबंधीयांनी हाणून पाडलेले ३ कृषी सुधारणा कायदे परत आणून लागू करा, अशी मागणी आता देशात जोर धरत आहे. दर्यापूरचे ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ते अरविंद नळकांडे यांच्या श्रमराज्य परिषदेच्या वतीने आयोजित विविध सामाजिक, राजकीय संघटनांमधील कृषी कार्यकर्त्यांच्या विचारमंथन बैठकीत ही मागणी करण्यात आली आणि ती पुढे रेटण्याचा निर्धारही करण्यात आला.
 
 
amt
 
 
 
विशेष म्हणजे, भारतातील ’स्वदेशी’ चळवळीचे पहिले हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनी ही बैठक झाली. याच तिथीला शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना करून शेतकरीहिताचा नवीन विचार मांडला होता. देशाच्या लोकसंख्येत अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार आहेत. परंतु, जाचक कायदे आणि भ्रष्ट व्यवस्था त्यांना नीट जगू देत नाही. या स्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी मोदींनी ३ सुधारित कृषी कायदे बनवले होते. परंतु, शेतर्‍यांच्या वेशातील खलिस्तानवाद्यांनी विरोधाच्या नावाखाली दिल्लीत हैदोस घालून आणि त्यांना विरोधी पक्षांनी पाठिंबा देऊन शेजारच्या देशांसारखे अराजक माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे कायदे सरकारला परत घ्यावे लागले, असा संताप व्यक्त करून बैठकीतील कार्यकर्त्यांनी हे कायदे त्वरित लागू करण्याची मागणी केली.
 
 
अरविंद नळकांडे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीला वनराईचे मधुकर घारड, माजी जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे, लोकसंग्राम पक्षाचे दिलीप देशमुख, श्रमराज्यचे प्रदीप इंगळे, भाजपाचे माणिकराव मानकर, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संजय आसरे, शीतल ठाकूर, भाकपचे रूपराव तिडके, राजेश गावंडे, वंचित बहुजन आघाडीचे अशोक नवलकार, उबाठा शिवसेनेचे किशोर टाले प्रामुख्याने उपस्थित होते. शरद जोशींच्या मूळ शेतकरी संघटनेचे लिंबाजी डोईफोडे, समाधान कणखर, प्रा. जयकिरण गावंडे, राजाभाऊ पुसदेकर, सुभाष राजूरकर, विजय लाजूरकर, प्रबुद्ध भारत मंचाचे प्रमोद इंगळे, शेषराव वानखडे, सुरेश भटकर, इंद्रजित खोब्रागडे, बसंत पाखरे, गोपाल गवई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रा. विनोद बिजवे, संदीप राजगुरे, अक्षय माहुरे, जयराज बयस, घनशाम माहुरे, गौरव बेहताडे, राघव माहुरे, पुरोगामी कुणबी समाज संघटनेचे चंद्रकांत ताथोड, नितीन मुळे, शांतरक्षक गवई, आदेश खांडेकर, सुरेश श्रीराव, विलास कोरडे आदी उपस्थित होते.