अंजनगाव सुर्जी,
eknath-shinde : अंजनगाव सुर्जी शहराचा विकास करण्यासाठी मी या ठिकाणी शब्द द्यायला आलो असून आमचा ध्येय खुर्ची नसून विकास आहे. ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसविले त्या लोकांचे प्रश्न, समस्या सोडविणे हे प्रमुख ध्येय आमचे आहे. या शहराच्या विकासाकरिता शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उभे असलेले नगराध्यक्ष पदाचे तसेच प्रभागातील शिवसेनेचे उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शहरातल्या पान अटाई येथे गुरूवारी आयोजित प्रचार जाहीर सभेत ते बोलताना होते. याप्रसंगी शिवसेनेचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार संजय गायकवाड, कॅप्टन अभिजीत अडसूळ, जिल्हा शिवसेनाप्रमुख सुनील डिके, गोपाल अरबट, उपनेत्या प्रीती बंड, ज्ञानेश्वर धाने पाटील, जगदीश गुप्ता, उमेदवार डॉ. स्पृहा अतुल डकरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, संत रुपलाल महाराजांच्या स्मारकाकरिता लागणारा पैसा कमी पडू देणार नाही तसेच मुलांकरिता क्रीडा संकुल, अंजनगाव घनकचरा कंपोस्ट खत कारखान्यासाठी निधी दिल्या जाईल. पानपिंपरीचा व्यवसाय मोठा असून योग्य प्रमाणात शेतकर्यांना पैसे मिळत नाही. यामधील एजंट काढून शेतकर्यांना कसे पैसे मिळतील अशी तरतूद आपण करू. त्याचप्रमाणे एसटी डेपोची समस्या संबंधित मंत्र्यांना सांगून त्याबाबत निर्णय घेऊ. केळी व संत्रा यावर प्रक्रिया करणारे उद्योग आपण या भागात सुरू करू तसेच युवा प्रशिक्षण योजनेतील अडचण दूर करून लवकरच युवकांना काम मिळेल. शहरातील एमआयडीसीत युवकांना रोजगार देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे आहे.
आजच्या रोडशो आणि प्रचार सभेत एवढी प्रचंड गर्दी पाहिल्यानंतर ही परिवर्तनाची नांदी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडी कुठेही प्रचारात दिसली नाही. त्यांनी पराभव मान्य केलेला आहे असे सांगून कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहावे लागते, कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, उन्हा तान्हात फिरावे लागते. शेतकर्याच्या बांधावर जावे लागते, घरात बसून राजकारण होत नसल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उ.बा.ठा शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. कोणी माईचा लाल जरी आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे सांगून मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, मी माझ्या अडीच वर्षाच्या काळात लोकाभिमुख, कल्याणकारी योजना राबविल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.