नागपूर,
Don Band-Doctor's Initiative : नागपूरच्या डॉक्टरांनी वैद्यकीय तणावातून मुक्त होण्यासाठी व कलागुणांना वाव देण्यासाठी एक आगळीवेगळी संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. डॉन बँड (डॉक्टर्स ऑफ नागपूर) या नावाने एक संगीत समूह स्थापन केला आहे.
या उपक्रमाची संकल्पना सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. सुरेश अय्यर (ग्लोबल व्हॉईस ऑफ डॉक्टर्स विजेते) व नामवंत रेडिओलॉजिस्ट डॉ. निशिकांत लोखंडे (ग्लोबल व्हॉईस ऑफ डॉक्टर्स उपविजेतेे) यांनी मांडली. त्यांच्यासोबत संगीतप्रेमी इतर डॉक्टरांनी सहभाग घेत वैद्यकीय व्यावसायिकता आणि संगीत यांचा सुंदर संगम साकारला.
डॉन बँडचा पहिला कार्यक्रम नुकताच आयएमए सभागृहात पार पडला. विविध वैद्यकीय क्षेत्रांतील डॉक्टरांनी एकल, युगल व समूह गायनाद्वारे रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. लॉस्ट लिजेन्ड्स, ऑसम अजय-अतुल, सूफियाना, नॉस्टॅल्जिक 90’एस, फास्ट नंबर्स आणि मेडली हे विभाग विशेष आकर्षण ठरले.
सादर करणाèया डॉक्टरांमध्ये डॉ. निशिकांत लोखंडे, डॉ. सुरेश अय्यर, डॉ. ऐश्वर्या रेवतकर, डॉ. अतुल रेवतकर, डॉ. समीर जहागीरदार, डॉ. प्राची संचेती, डॉ. विनीत निरंजन, डॉ. नेकी राजदेव, डॉ. योगेश बंग, डॉ. ऋजु चिमोटे, डॉ. प्रतीक पडोळे, डॉ. जुही जोशी व डॉ. अमी रहाटेकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन डॉ. अनुराधा रिधोरकर व डॉ. अक्षय कृपलानी यांनी केले. संगीत संयोजन नागपूरचे प्रसिद्ध संगीतकार परिमल जोशी तर ध्वनी संयोजन अजय यांनी केले. आयएमए नागपूरचे अध्यक्ष डॉ. राजेश सावरबांधे व मानद सचिव डॉ. जितेंद्र साहू यांनी सभागृह उपलब्ध करून दिले. या संगीतमय कार्यक्रमाला नागपूरमधील मान्यवर, डॉक्टर, व संगीतप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला.