नागभीड,
Tiger attack : ब्रम्हपुरी वनविभागांतर्गत येणार्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील आलेवाही बिटमधील जीवनपूर गावातील एका युवकाला वाघाने जखमी केल्याची घटना गुरूवार, 19 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. प्रविण मेघश्याम चिमलवार (रा., जीवनपूर) असे जखमी युवकाचे नाव आहे.

प्रविण चिमलवार हा युवक मानसिकदृष्ट्या असंतुलित असल्याने नेहमी गावाशेजारील जंगल परिसरात भटकंती करत असतो. गुरुवारी तो गावाजवळील एका शेताच्या नाल्याजवळ बसला असता वाघाने त्याच्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरुप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक अरविंद माने व वनरक्षक पंडित मेकेवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमी युवकाला तात्काळ सिंदेवाही येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्याच्या उजव्या भुजेवर वाघाच्या दातांच्या किरकोळ जखमा झाल्या आहेत व सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी सध्या कॅमेरे बसविण्यात आले असून, परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच वनविभागाच्या वतीने परिसरातील शेतकर्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.