तभा वृत्तसेवा
वणी,
Sahil Puri-Tadipar : सेवानगरातील अट्टल गुन्हेगार साहिल कैलास पुरी (वय 20) याला सहा महिन्यांकरिता पोलिसांनी तडीपार केले आहे. त्याच्यावर चोरी, जबरी चोरी तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.
साहिल पुरीच्या वर्तनात कोणताही सुधार होत नव्हता. दिवसेंदिवस त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतच होती. त्यामुळे त्यास वणी उपविभागीय अधिकाèयांच्या आदेशाने महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये सहा महिन्यांकरिता तडीपारीचा आदेश पारीत करण्यात आला आहे.
तडीपारीत त्याला यवतमाळ जिल्हा तसेच वणी तालुक्यास लागून असलेल्या इतर जिल्ह्यांलगतचे तालुके वरोरा, भद्रावती, कोरपना तालुक्यांच्या हद्दीबाहेर जाण्याबाबत आदेश पारित झाला आहे.
साहिल पुरी याला मंगळवार, 1 जुलै रोजी तडीपार आदेशाची तामील करण्यात आली. नंतर त्याला नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे त्याच्या नातेवाईकांकडे उमरेड पोलिस ठाणे हद्दीत सोडण्यात आले.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाळ उंबरकर, धीरज गुल्हाने, मोनेश्वर, वसीम, कुडमेथे, मेश्राम, नंदकुमार यांनी पार पाडली.