देवळी,
Rajesh Bakane राज्याच्या कृषी क्षेत्रात उगम पावलेल्या बोगस बियाण्यांच्या धक्कादायक प्रकारावर विधानसभेत तीव्र आवाज उठवण्यात आला. आ. राजेश बकाने यांनी लक्षवेधीत मुद्दा उपस्थित केला. राज्यातील हजारो शेतकर्यांचे आयुष्य उध्वस्त करणार्या बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी भाषणात त्यांनी कविता सादर करताच सदस्यांनी बाकं वाजवून प्रतिसाद दिला.
आ. बकाने यांनी हैदराबाद येथील ‘वरुण सीडस अॅण्ड अग्रोटेक (इंडिया) प्रा. लि. आणि सोनम सीड टेनॉलॉजी प्रा. लि. या कंपन्यांनी सोयाबीनचे बोगस व उगमक्षमतेविना बियाणे विकले. या बोगस बियाण्यांमुळे राज्यातील शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहेत. हे बियाणे म्हणजे शेतकर्यांच्या शेतीची हत्या आहे. त्यामुळे या कंपन्यांवर फसवणुकीचा नाही तर थेट हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आ. बकाने यांनी सभागृहात केली.
संबंधित बियाण्यांचे परीक्षण करणारे व नोंदणी देणारे कृषी विभागातील अधिकारी, जिल्हा बियाणे निरीक्षक आणि संशयास्पद मंजुरी देणारे वरिष्ठ अधिकार्यावरही कठोर विभागीय व फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली. या कंपन्यांना काळ्या यादीत टाका. त्यांचे परवाने रद्द करा आणि संबंधित अधिकार्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा, अशी ठाम भूमिका आ. बकाने यांनी घेतली.
शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाने त्वरित विशेष निधी जाहीर करावा आणि दोषी कंपन्यांकडून ही रक्कम वसूल करून शेतकर्यांपर्यंत पोहोचवावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. ही लढाई विधानसभेपासून रस्त्यावर लढवू, असा इशारा देखील आ. बकाने यांनी दिला.