पालकमंत्र्यांनी घेतला पुरपरिस्थितीचा आढावा
सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना
वर्धा,
Dr. Pankaj Bhoyar गेले दोन दिवस जिल्ह्यात संततधार सुरु असून बहुतांश सर्व मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. ठिकठिकाणी घरांची पडझड व शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने मिशन मोडवर नुकसानीचे पंचनामे करावे. पंचनामे करतांना एकही नुकसानग्रस्त सुटणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केल्या.
पालकमंत्र्यांनी आज मंत्रालय मुंबई येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे संततधारमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीस खा.अमर काळे, आ.दादाराव केचे, आ.समीर कुणावार, आ.सुमीत वानखेडे, आ.राजेश बकाने दूरदृष्यप्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे जिल्हाधिकारी कार्यालयातून उपस्थित होते.
जिल्ह्यात ५४ पैकी ५० मंडळात अतिवृष्टी झाली आहे. आज दिवसभर संततधार असल्याने मोठ्या प्रमाणावर पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. पालकमंत्र्यांनी तालुकानिहाय उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. जिल्ह्यात सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर रहावे. अतिवृष्टीत कुठेही अनूचित प्रकार घडणार नाही, यासाठी ग्रामस्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेऊन रहावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
येत्या दोन दिवसांत घरांची पडझड, गोठे, शेतजमिनी व शेतपिकांचे नुकसान याबाबत पंचनामे करावे. पंचनामे करतांना तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकाने संयुक्त पाहणी करावी. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यातून सुटू नये. शनिवारी सर्व आमदार, लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात आहे. त्यावेळी पंचनामे व नुकसानीची स्थिती त्यांच्यासमोर ठेवा. नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान व पुरस्थितीत मृत नागरिकांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची मदत दोन दिवसांत वितरीत करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
पुरामुळे ज्या ठिकाणी रस्ते, पुलांचे नुकसान झाले आहे, तेथे तातडीने दुरुस्तीची कामे करण्यात यावी, पुरस्थितीत वारंवार मार्ग बंद होणारे रस्ते, पुलाची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी. यावेळी त्यांनी ग्रामीण रस्ते, वीज पुरवठा, विद्युत खांब, तारांचे नुकसान आदींची देखील माहिती घेतली. खासदार, आमदारांनी देखील मतदारसंघातील पुरस्थितीची माहिती घेऊन आवश्यक सूचना केल्या.