ग्रामस्थांनी मृतदेह नेला महावितरण कार्यालयात

नुकसान भरपाई, दोषींवर कारवाईची मागणी

    दिनांक :09-Jul-2025
Total Views |
वर्धा,
Mahavitaran office सर्व्हिस लाईनचा केबल तुटून शेतात पडल्याने शेतकर्‍याला विजेचा धका लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार ८ रोजी दुपारच्या सुमारास भूगाव येथे घडली. शेतकर्‍याच्या मृत्यूसाठी महावितरणला जबाबदार धरत संतप्त ग्रामस्थांनी आज बुधवार ९ रोजी मृतदेह थेट महावितरण कार्यालय वर्धा येथे आणला. अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयासमोर मृतदेह ठेवून निषेध सुरू केला. प्रदीप उगेमुगे (५४), असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.
 
 
Mahavitaran
 
प्रदीप उगेमुगे मंगळवारी दुपारी त्याच्या शेतात जात होता. सर्व्हिस लाईन वायर तुटून शेतात पडला होता. पावसामुळे शेत ओले असल्याने वीज प्रवाह पसरला. यातच विजेचा धका लागल्याने शेतकर्‍याचा मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकर्‍याचा मृत्यू झाला, असा आरोप मृतकाच्या परिवार आणि ग्रामस्थांनी केला आहे. मृताच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी मृतदेह घेऊन बोरगाव मेघे येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. शेतकर्‍याचा मृतदेह थेट अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर ठेवण्यात आला. महावितरण कार्यालयात दोन तास गोंधळ झाला. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. सुरक्षेसाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मृताच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. भाजपचे मिलिंद भेंडे, अधीक्षक अभियंता स्मीता पारीख आणि पोलिस निरीक्षक पराग पोटे यांच्या उपस्थितीत कुटुंब आणि ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. सरकारी मदतीसह इतर मागण्यांवर लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.