rainfall यावर्षी सुरूवातीला जिल्ह्यात पावसाने हुलकावणी दिली. नंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे पेरणीच्या कामांना गती मिळत शेतशिवार हिरवे झाले. सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून थांबून थांबून पाऊस धो-धो बरसत आहे. ऐरवी, सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात १५५.२ मिमी पाऊस कोसळतो. पण यंदाच्या सप्टेंबर महिन्यात अवघ्या १५ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १९५.२ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. एकूणच सरासरीच्या तुलनेत सप्टेंबरच्या पंधरा दिवसांत १२५.८ टके पाऊस झाल्याने पिकांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.
जून महिना कोरडाच गेला. मात्र, जुलैच्या सुरुवातीच्या दिवसात पावसाने जोर धरला होता. १५ जुलैनंतर आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकर्यांनीही पेरणीची कामे आटोपली. त्यानंतर पुन्हा पावसाने खंड दिला. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पाऊस झाला. तो पिकांसाठी संजीवनी ठरला. ऑगस्ट महिन्यातही पावसाची तुट कायम राहिल्याने जिल्ह्यातील जलाशय केवळ ६० टकेच भरले होती. आता सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाने जोर धरला. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यावर पूरपरिस्थितीचे संकट ओढावले. जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ११, १२ व १३ सप्टेंबरला जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला.rainfall यामुळे नद्या-नाल्यांच्या पाणी पात्रात कमालीची वाढ झाली. पूर परिस्थिती निर्माण होत काही गावात पुराचे पाणीही शिरले होते. संभाव्य धोका लक्षात घेता काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. १६ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात पावसाचा अंदाज असून सोमवार १५ रोजी दुपारपर्यंत जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. नंतर काही ठिकाणी मेघगर्जनेसह चांगला पाऊस कोसळला.