अंबाझरी-सीताबर्डीतील दोन हुक्का पार्लरवर छापे

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
raids-on hookah-parlours सीताबर्डी आणि अंबाझरी हद्दीत अवैधरित्या सुरू असलेल्या दोन हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या पथकांनी धाड घालून चार आरोपींना अटक केली. पार्लरमधून हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर्स तसेच हुक्का पिण्यासाठी वापरली जाणारे साहित्य जप्त केले. स्थानिक ठाणेदारांच्या ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे हुक्का पार्लर सुरु असतात, अशी चर्चा आहे.
 
raids
बुधवारी रात्री गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी शहरातील २० हुक्का पार्लरची तपासणी केली. त्यात शंकरनगर चौकातील आनंद भंडार रेस्टॉरेंट बिल्डींगमधील पहिल्या मजल्यावर फ्युजन कॅफे येथे हुक्का पार्लर सुरू होता. पोलिसांनी धाड घातली तेव्हा विक्रांत भगवंत शिंदे (२७) रॉय टाऊन, इसासनी आणि शुभम सुनील वैद्य (२४) जुनी वस्ती खामला हे ग्राहकांना तंबाखूजन्य हुक्का पुरविताना मिळून आले. या पार्लरमधून हुक्का पॉट, वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखू, रोख व इतर साहित्य असा ३३ हजार ५०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक केली.
अंबाझरीतील नाईन लाउंज हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा घातला. यावेळी येथे मालक, व्यवस्थापक आणि १० ग्राहक आढळले. रात्री १०.३० पर्यंत ही कारवाई चालली.गांधीनगर हिल रोडवर नाईन लाउंज हुक्का पार्लर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा होती. येथे हुक्का पिण्यासाठी पहाटेपर्यंत तरुण-तरुणींची गर्दी असल्याचीही चर्चा होती. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने येथे मंगळवारी, १३ ऑक्टोबरला छापा घातला. यावेळी तेथे हुक्का पार्लरचा मालक अभिषेक शिखरचंद जैन (वय ४१), व्यवस्थापक निखिल संजय खोब्रागडे (वय ३७) आणि कर्मचारी रुपेश कृष्णराव वानखेडे, आतमधील १० ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून देत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तेथून या १३ जणांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलिस निरीक्षक दर्शन पाटील आणि सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.