देवळी,
sudhakar-kohale-nagpur-graduates-electionनागपूर विभागा पदवीधर निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ स्थानिक चंद्रकौशल्य सभागृहात आयोजित कार्यकर्ता व पदवीधर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, आ. राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, देवळी नपचे उपाध्यक्ष राहुल चोपडा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे विजय आगलावे आणि विलास कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन केले.
महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी मागील पाच वर्षांत काँग्रेसच्या आमदाराने पदवीधरांशी पुरेसा संपर्क ठेवला नाही आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अपेक्षित प्रयत्न केले नाही. ही निवडणूक केवळ एका पदाची निवडणूक नाही. पदवीधरांच्या अपेक्षांना आवाज देण्याची त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची आणि नागपूर विभागातील पदवीधरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची ही संधी आहे. पदवीधर मतदारांनी मतदानातून साथ द्यावी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रचार करून विजयासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.
आ. बकाने यांनी मागील निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा क्षेत्रातील पदवीधर मतदारांची नोंदणी २१८५ वरून २८४२ पर्यंत पोहोचली आहे. ही वाढ कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फलित आहे. मात्र केवळ मतदार नोंदणी करून चालणार नाही तर प्रत्येक नोंदणीकृत पदवीधर मतदारापर्यंत पोहोचून त्याचे रूपांतर मतदानात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. माजी खासदार रामदास तडस यांनीही सुधाकर कोहळे यांना विजयी करण्यासाठी महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, मंडळप्रमुख, बूथप्रमुख, कार्यकर्ते, पदवीधर मतदार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.