ज्येष्ठ पत्रकार मिलिंद किर्ती यांचे अपघाती निधन

    दिनांक :14-Oct-2026
Total Views |
नागपूर
milind-kirti वृत्तपत्र कार्यालयातील कर्तव्य आटोपून दुचाकीने घरी परतणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार मिलिंद किर्ती काशीनाथ गायधने (६०) रा. वाडी यांनी भरधाव दुचाकीने धडक दिली. या अपघातात मिलिंद किर्ती यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर धडक देणाऱ्या दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री पावनेअकरा वाजता वाडी उड्डानपुलावर झाला.
 
milind
 
मिलिंद किर्ती हे एका स्थानिक वृत्तपत्रात कार्यरत होते. मंगळवारी रात्री १०.४५ ते आपली ड्युटी आटोपून दुचाकीने घरी जात होते. वाडी उड्डाण पुलावरून जात असताना त्यांच्यासमोरून एक चारचाकी वाहन जात होते. कारचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने किर्ती यांनीही आपल्या दुचाकीचा ब्रेक दाबला. तोच मागून येणार्‍या (एमएच ४९ सीव्ही ३३००) क्रमांकाच्या दुचाकीचालक युवक आश्रय डागा याने किर्ती यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते दुचाकीसह कारवर आदळले आणि दुचाकीसह डोक्याच्या भारावर खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर इजा झाल्याने उपचारासाठी रामदासपेठ येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पहाटे तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचालक आश्रय डागा आणि मागे बसलेला युवक यश हे सुद्धा जखमी झाले. या अपघातात कारचे सुद्धा नुकसान झाले. याप्रकरणी वाडी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
 
मिलिंद किर्ती हे पत्रकारितेसोबत साहित्य आणि वैचारिक क्षेत्रातील योगदानासाठी ओळखल्या जात होते. तंत्रज्ञान, तत्वज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्तेचा वाढता प्रभाव आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम यासारख्या विविध विषयांवर भाष्य करणारी पुस्तके लिहिली होती. त्यातील कृत्रिम बुद्धीमत्तेचे मायाजाल युग, तंत्रज्ञानाची प्रबख सत्ता, आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचे मायाजाल युग : सहमतीची हुकूमशाही अ‍ॅरिस्टोक्रसी टू टेक्नोक्रसी ही दोन पुस्तके लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्यावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार पार पडला.