अर्ध्या एकरात पिकविली पक्ष्यांसाठी ज्वारी

हिंगणघाटच्या शेतात रंगली पाखरांची दिवाळी

    दिनांक :13-Nov-2026
Total Views |
हिंगणघाट,
grew-sorghum-for-birds दिवाळी म्हटलं की फराळ, गोडधोड आणि आनंदाची मेजवानी! मात्र, यंदा हिंगणघाटमध्ये माणसांसोबत पक्ष्यांचीही दिवाळी साजरी होत आहे. पक्ष्यांना नैसर्गिक खाद्य उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने हिंगणघाट येथील तरुण शेतकरी व पक्षी अभ्यासक निसर्गसाथी ऐतिहासिक ग्रुपचे सदस्य शेखर जामूनकर यांनी आपल्या अर्धा एकर शेतात खास पक्ष्यांसाठी ज्वारीची लागवड केली आहे. या ज्वारीला आता कणसे भरली असून त्यातील दाण्यांवर ताव मारण्यासाठी विविध पक्ष्यांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे.
 
 
grew-sorghum-for-birds
 
शेतात ट्राय-कलर मुनिया, रेड मुनिया, स्केली-ब्रेस्टेड मुनिया, सिल्व्हर बिल, प्लम-हेडेड पॅराकिट आणि रोज-रिंग्ड पॅराकिट असे विविध पक्षी ज्वारीचे दाणे खाताना दिसत आहेत. पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि त्यांच्या मुक्त संचाराने हे शेत जणू पक्ष्यांसाठी हक्काचे अन्नक्षेत्र बनले आहे.
विशेष म्हणजे, ऐन दिवाळीच्या काळात आणि पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने ज्वारीची कणसे दाण्यांनी भरली आहेत. त्यामुळे पक्ष्यांना त्यांच्या आवडीचे नैसर्गिक खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. माणसांच्या दिवाळीच्या फराळाप्रमाणेच पक्ष्यांनाही ज्वारीच्या दाण्यांची मेजवानी मिळत असून, पक्षी सप्ताहात पाखरांची दिवाळी साजरी होत आहे. वन्यजीव छायाचित्रकार एम. एस. आर. शाद यांनी या शेतात जाऊन दाणे खाणार्या पक्ष्यांची छायाचित्र टिपलेली आहेत.
 
 
पक्षी अभ्यासक प्रवीण कडू यांच्या मार्गदर्शनातून आणि पक्षी संवर्धनाच्या विचाराने प्रेरित होऊन शेखर जामूनकर यांनी हा उपक्रम हाती घेतला. पक्ष्यांच्या नैसर्गिक अन्नस्त्रोतांमध्ये होणारी घट, यामुळे अनेक पक्ष्यांना अन्न मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पक्ष्यांसाठी स्वतंत्रपणे धान्य पिकविणे म्हणजे केवळ त्यांना अन्न देणे नव्हे, तर त्यांच्या नैसर्गिक खाद्य साखळीला आणि जैवविविधतेला हातभार लावणे होय. ज्वारीसारख्या धान्य पिकांमुळे दाणे खाणाऱ्या पक्ष्यांना अन्न मिळते, तर शेतातील हिरवळ आणि वनस्पतींचे आच्छादन इतर लहान जीवांनाही आधार देते.
 
या उपक्रमाचा विस्तार करण्याचा मानसही शेखर जामूनकर यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात ज्वारीसोबतच बाजरी, कोदो, कुटकी आणि लारा यासारख्या मिलेट धान्यांची लागवड करून पक्ष्यांसाठी विविध प्रकारचे नैसर्गिक खाद्य उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.