अमरावती विद्यापीठाची महिला चमू अव्वल

    दिनांक :10-Feb-2026
Total Views |
अ. भा. आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धा
अमरावती, १० फेब्रुवारी
Amravati University women's team tops संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या यजमानपदाखाली १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेचा मंगळवारी समारोप झाला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या महिला संघाने सर्वांवार मात करत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकाचा मान मिळविला. उपविजेता संघ लवली प्रोफेशनल युनिर्व्हसिटी, जालंधरने रजत पदक, कालिकत विद्यापीठ व चंदिगड युनिर्व्हसिटीने कांस्य पदक पटकाविले. यावेळी ट्रॉफी व पदके देवून मान्यवरांच्या हस्ते चारही चमूंना सन्मानित करण्यात आले.
 

amt 
 
याप्रसंगी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सर्व सहभागी खेळाडूंचे कौतूक करुन खेळामध्ये जय-पराजय होत असतो, परंतु त्यामुळे खचून जावू नये. सहभाग देखील तितकाच महत्वाचा असून हा आपल्या जीवनातील महत्वाचा क्षण असतो, असे सांगून पुरुष स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने सुवर्ण पदक पटकाविले, तर महिला स्पर्धेतही अमरावती विद्यापीठाने सुवर्ण पदकाचा मान मिळवून राष्ट्रीय स्तरावर आपल्या विद्यापीठाचा नावलौकीक केला आहे. सर्व खेळाडू, प्रशिक्षक तसेच मार्गदर्शक यांचे त्यांनी भरभरुन कौतूक करुन अभिनंदन केले. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, उपाध्यक्ष जयवंत उर्फ भैय्यासाहेब पुसदेकर, कार्यकारिणी सदस्य सुरेश खोटरे, सुभाष बनसोड, प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे, प्राचार्य अंबादास कुलट, दिलीप तिरके, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत, डॉ. रुपाली इंगोले आदी उपस्थित होते.
 
 
Amravati University women's team tops  यावेळी लवली प्रोफेशनल युनिर्व्हसिटीची खेळाडू अनुराधा भिंगारे व संघ मार्गदर्शक प्रभारिका गौर यांनी मनोगत व्यक्त करताना चांगल्या सुविधांबद्दल अमरावती विद्यापीठ तसेच आयोजक महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी विविध विद्यापीठांच्या प्रशिक्षक, मार्गदर्शक, पंच तसेच स्पर्धेच्या आयोजनासाठी परिश्रम घेणा-या सर्व शारीरिक शिक्षण संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोपटे देवून सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट टिचर पुरस्कार कंचन (लवली प्रोशनल युनिर्व्हसिटी, जालंधर), बेस्ट कॅचर ममता (पंजाब विद्यापीठ), बेस्ट फास्टमॅन हन्सा मोल (कालिकत विद्यापीठ), बेस्ट सेकंड फास्ट मॅन सोनी (पंजाब युनिर्व्हसिटी, चंदिगड), बेस्ट थर्ड मॅन दिव्या (जालंधर विद्यापीठ), बेस्ट शॉट नवदीप (पंजाब विद्यापीठ, चंदिगड), बेस्ट लेफ्ट लॉक कमला (पंजाब युनिर्व्हसिटी, चंदिगड), बेस्ट सेंटर लॉक अश्विनी (कालिकत विद्यापीठ), बेस्ट राईट लॉक सँड्रा (कालिकत विद्यापीठ), ऑल राऊंडर क्षितिजा (संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. रुपाली इंगोले यांनी स्पर्धेच्या शुभारंभापासूनची रुपरेखा सांगितली. सूत्रसंचालन अवंतिका मानकर व डॉ. रेखा मग्गीरवार यांनी, तर आभार क्रीडा संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी मानले.