‘त्या’ कर्मचार्‍यास नोटीस; कायदेशीर कारवाई होणार

    दिनांक :17-Feb-2026
Total Views |
* जिल्हाधिकारी कार्यालयातील चित्रफित प्रकरणी खुलासा
* तभाच्या बातमीची दखल

चंद्रपूर, 
Collectorate case जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचार्‍यांना महिलेशी वाद घातला आणि तिच्या अंगावर धावून गेला, अशी चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. तरूण भारतनेसुध्दा ती बातमी केली. त्यावर जिल्हा प्रशासानाने आपली भूमिका स्पष्ट केली असून, या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरू केली आहे. या प्रकरणात प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून, संबंधित कर्मचार्‍याला कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे. प्राप्त खुलाशाच्या आधारे आवश्यकतेनुसार पुढील योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे या खुलाश्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
 
cdkdls
 
Collectorate case  प्रशासनाने नमूद केले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा त्या अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयांमध्ये येणार्‍या सर्व नागरिकांशी सन्मानपूर्वक व संवेदनशीलतेने वागणे, ही प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍यांची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारची अरेरावी किंवा अनुचित वर्तन सहन केले जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. याप्रकरणी भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना संयम, शिष्टाचार व प्रशासनाची प्रतिमा लक्षात ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही नागरिकास जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा क्षेत्रीय कार्यालयात काही तक्रार असल्यास संबंधित कर्मचार्‍यांशी वाद घालण्याऐवजी थेट कार्यालय प्रमुखांशी संपर्क साधून रीतसर लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारींची पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही प्रशासनाने दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी स्पष्ट केले आहे.