सह्यांची मोहीम जाहीर
तिवसा,
Loan waiver महाराष्ट्रासह देशातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी संकटाचा दुहेरी फटका सहन करत असून, नैसर्गिक आपत्ती, अपुरे दर आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचला आहे. या पृष्ठभूमीवर सर्व शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या तिवसा तालुका कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलमार्फत निवेदन सादर केले. तसेच या मागणीसाठी तिवसा तालुक्यात व्यापक सह्यांची मोहीम राबविण्याची घोषणा करण्यात आली.
प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात राज्यभर सुरू असलेल्या कर्जमाफी आंदोलनाच्या पृष्ठभूमीवर तिवसा तालुक्यातही आंदोलन तीव्र करण्यात येत आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रायगडाच्या पायथ्याशी तीन दिवस उपोषण, आमदारांच्या घरासमोर टेंभा आंदोलन, रक्तदान आंदोलन, मोझरी येथे सात दिवस अन्नत्याग आंदोलन, शेकडो मैलांची पायी वारी आणि नागपूर येथे चक्काजाम आंदोलन असे विविध आंदोलनात्मक उपक्रम राबविण्यात आले होते.
यंदाच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकर्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. ज्या शेतकर्यांचे पीक आले, त्यांनाही बाजारात हमीभाव मिळाला नसल्याने कमी दरात शेतमाल विकण्याची वेळ आली. त्यामुळे कर्ज फेडणे तर दूरच, दैनंदिन खर्च, शिक्षण आणि आरोग्याच्या गरजा भागविणेही कठीण झाले आहे.
Loan waiver आश्वासनांची आठवण करून देत आंदोलन विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्तेत आल्यानंतर सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. काही मंत्र्यांनी चारचाकी वाहन किंवा शेतात घर असलेल्या शेतकर्यांना कर्जमाफी नाकारण्याचे संकेत दिल्याने शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
प्रहार कार्यकर्त्यांनी यावर तीव्र आक्षेप घेत, शेतात शेती उपयोगासाठी बांधलेली खोली किंवा काटकसर करून घेतलेली चारचाकी गाडी ही कर्जमाफी नाकारण्याचे कारण ठरू नये, अशी भूमिका मांडली. शेतकरीही आधुनिक सुविधा वापरण्याचा हक्कदार आहे, असे त्यांनी नमूद केले. शेतकर्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासनावर दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिली.