विश्वकल्याणाची भावना हिंदू समाजातच- अतुल मोघे

तिवस्यात सकल हिंदू संमेलन

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
तिवसा, 
All Hindu Conference in Tivasiyat संपूर्ण जगाचे व विश्वाचे कल्याण व्हावे, अशी व्यापक व सर्वसमावेशक भावना जर कोणाच्या मनात असेल, तर ती हिंदू समाजाच्या मनात आहे, असे प्रतिपादन , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुली मोघे यांनी केले. येथील समर्थ लॉन येथे आयोजित सकल हिंदू संमेलनात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या भव्य व प्रेरणादायी संमेलनाला विविध क्षेत्रातील संत, मान्यवर व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री जनार्दन बोथे होते. संत म्हणून माहेश्वरी दीदी, देवराजजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. अतुल मोघे यांनी हिंदू संस्कृतीची वैश्विकता, सहिष्णुता व सर्वांगीण कल्याणाची परंपरा अधोरेखित केली. हिंदू समाज हा केवळ स्वतःच्या नव्हे तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारा समाज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदू समाजाने आपल्या परंपरा, संस्कार व संघटनशक्ती अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
 
 
tivsa
 
यावेळी परमेश्वरी शेलोटकर व ज्योती शेलोटकर यांनी सादर केलेल्या शौर्य प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणातून हिंदू समाजातील शौर्य, आत्मविश्वास व संस्कारांचे प्रभावी दर्शन घडले. मार्गदर्शन करताना माहेश्वरी दीदी यांनी हिंदूंचे आचार-विचार, संस्कृती, परंपरा व संस्कार यांचे महत्त्व विशद केले. सध्याच्या काळात पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत असून हिंदूंनी आपल्या मूळ संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी सजग राहावे, असे आवाहन त्यांनी केले. संमेलनाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार यश खाजबागे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी तालुका सहकार्यवाह भूषण आमले, तालुका बौद्धिक प्रमुख मिलिंद डेहनकर, आयोजन समितीचे संयोजक अजय गुल्हाने, सहसंयोजक सुमित अनासने तसेच मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी परिश्रम घेतले.