पिपरियाचा वीरपुत्र अमर…

२१ तोफांच्या सलामीत सुभेदार नेतराम कटरेंना अखेरचा निरोप

    दिनांक :21-Feb-2026
Total Views |
गोंदिया,
Gondia, Salekasa taluka: सालेकसा तालुक्यातील पिपरिया (सुखाटोला) या छोट्याशा गावाने आज आपल्या शूर वीरपुत्राला अश्रुपूर्ण निरोप दिला. भारतीय सैन्य दलातील सुभेदार नेतराम हेमराज कटरे यांनी हिमाचल प्रदेशात कर्तव्य बजावत असताना १९ फेब्रुवारी रोजी वीरमरण पत्करले. शनिवार २१ रोजी त्यांचे पार्थिव स्वगावी पोहोचताच संपूर्ण परिसर ‘नेतराम कटरे अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
 

Gondia, Salekasa taluka: 
शासकीय इतमामात व २१ तोफांच्या सलामीसह त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या या वीर जवानाला अखेरचा निरोप देताना गावकऱ्यांचे डोळे पाणावले होते. प्रत्येकाच्या ओठांवर अभिमान आणि हृदयात वेदना दाटून आली होती.
सुभेदार कटरे हे २००१ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि धैर्य यांच्या बळावर त्यांनी सैन्यात मानाचे स्थान मिळवले. सध्या ते सुभेदार पदावर कार्यरत होते. हिमाचल प्रदेशातील शिमला शहरापासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर ते सेवेत असताना १९ फेब्रुवारी रोजी सडक मार्गाने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनावर डोंगरावरील दरड कोसळली. या दुर्दैवी अपघातात ते हुतात्मा झाले आणि देशाने एक कर्तव्यदक्ष सैनिक गमावला.
त्यांच्या पार्थिवाचे गोंदिया, आमगाव आणि सालेकसा येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. हजारो नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. वातावरणात हळहळ आणि अभिमान यांचे मिश्र भाव दाटून आले होते.
पिपरिया येथे झालेल्या अंत्यसंस्कारावेळी आमदार संजय पुराम, माजी आमदार सहसराम कोरोटे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले, पोलिस निरीक्षक भूषण बुराडे, पंस उपसभापती जितेंद्र बल्हारे, सरपंच अनिल सोयाम, ग्रामपंचायत अधिकारी वैष्णव यांच्यासह सैन्य दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते. सर्वांनी पुष्पचक्र अर्पण करून या वीर जवानास भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
पिपरिया गावासाठी हा क्षण दुःखाचा असला, तरी आपल्या मातीतून असा शूर पुत्र जन्माला आला याचा अभिमानही तितकाच मोठा आहे. सुभेदार नेतराम कटरे यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील.