‘गृहिणी ते उद्योजक’ : रूपाली गायकी यांचा यशस्वी प्रवास

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग’ योजनेचा आधार

यवतमाळ, 
'housewife to entrepreneur' शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द असेल, तर संकटांचे डोंगरही पार करता येतात, हे यवतमाळच्या रूपाली आशिष गायकी यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. घरची परिस्थिती बेताची व शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण असताना, रूपाली गायकी यांनी ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग’ योजनेचा आधार घेत उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहिले. आज त्या ‘राघवी लाकडी तेलघाणा’ या उद्योगाच्या माध्यमातून वार्षिक 5 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
 
 
house
 
यातून गायकी कुटुंबियांसाठी शेतीपूरक व्यवसाय हा आर्थिक सक्षमतेचे साधन ठरत असून या गृहउद्योगातून रूपाली गायकी यांनी ‘आत्मनिर्भरते’कडे प्रवास सुरू केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कापरा मेथडच्या रूपाली गायकी यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. पती शेती करायचे, परंतु मोठ्या कुटुंबाचा खर्च भागवणे केवळ शेतीवर शक्य नव्हते.
 
 
'housewife to entrepreneur' उद्योगाची निवड करताना रूपाली यांनी केवळ नफ्याचा विचार न करता सामाजिक आरोग्याचा विचार करून ‘शुद्ध लाकडी तेलघाणा’ सुरू करण्याचे निश्चित केले. यासाठी त्यांना कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथून प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. उद्योगासाठी भांडवल उभारताना त्यांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या योजनेचा मोठा आधार मिळाला. कृषी विभाग व ‘आत्मा’च्या सहकार्याने त्यांचे कागदपत्रे पूर्ण होऊन युनियन बँकेमार्फत 3 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. विशेष म्हणजे, यावर त्यांना 35 टक्के सबसिडीसुद्धा प्राप्त झाली. स्वतःकडील 2 लाख व बँकेचे 3 लाख अशा एकूण 5 लाख रुपयांतून त्यांनी आपला प्रकल्प उभा केला. सुरुवातीला अडचणी आल्या, पण खचून न जाता त्यांनी गुणवत्ता टिकवून ठेवली. आज त्या पती व मुलासह हा व्यवसाय चालवतात. केवळ तेलच नव्हे, तर त्यातून निघणारी ढेप देखील पशुखाद्य म्हणून विकली जात असल्याने उत्पन्नात भर पडली आहे.