११.९६ लाखाच्या खताची परस्पर विक्री

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
कृषी केंद्राच्या कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल
 
अंजनगाव सुर्जी, 
Sale of fertilizers अंजनगाव सुर्जी येथील आठवडी बाजार परिसरातील शिवकृपा अ‍ॅग्रो एजन्सी या खत व कीटकनाशक विक्री केंद्राच्या गोदामामधून ६६१ पोती खत परस्पर विकून ११ लाख ९६ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दुकानाचे मालक वसंत भगत यांच्या तक्रारीवरून गोदामकिपर अंकुश धुळे याच्याविरुद्ध अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
fertilizers
 
फिर्यादी वसंत मोतीराम भगत हे शिवकृपा अ‍ॅग्रो एजन्सीचे चालक आहेत. त्यांच्या गोदामामध्ये अंकुश धनंजय धुळे (३०) रा. द्वारका चौक, सुर्जी हा गेल्या दोन वर्षांपासून काम करत होता. आरोपीने मालकाला कोणतीही कल्पना न देता गोडाऊनमधील डीएपी, पोटॅशसह विविध कंपन्यांचे ६६१ पोते खत परस्पर विकले. या खतांची अंदाजे बाजार किंमत ११ लाख ९६ हजार रुपये आहे. साठा तपासणी दरम्यान ही फसवणूक मालकाच्या लक्षात आली.
 
 
Sale of fertilizers  फिर्यादी भगत यांनी १६ एप्रिल रोजी अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी अंकुश धुळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा अपहार ३० मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे. ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करत आहेत. आरोपीने खत कोणाला विकले, रक्कम कुठे वापरली याचा शोध पोलिस घेत असून ऐन हंगाम सुरू होण्याच्या पृष्ठभूमीवर झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी व व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.