पड रे पाण्या, पड रे पाण्या... म्हणत कापूस उत्पादक यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम विदर्भातील बळीराजा चातकासारखी पाहतोय वाट !
पारवा,
Cotton growers नक्षत्र (मिरुग) सुरू होऊन आठवडा उलटला, तरीही पावसाने दडी मारल्यामुळे पश्चिम विदर्भातील मुख्य कापूस उत्पादक पट्ट्यात चिंतेचे ढग दाटले आहेत. ’पांढरे सोने’ पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाèया यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील पारवा परिसरासह संपूर्ण पश्चिम विदर्भात पावसाअभावी शेतीची कामे ठप्प झाली आहेत. दरवर्षी 7 जूनला लागणाèया मृग नक्षत्राकडे डोळे लावून बसलेला बळीराजा आज 15 जून उजाडली तरी पाऊस न पडल्याने हताश झाला आहे. संपूर्ण परिसरातून आता ‘पड रे पाण्या, पड रे पाण्या..’ अशी आर्त साद घालत शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे.
निसर्गात जसा चातक पक्षी केवळ पावसाच्या पाण्यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसतो, हुबेहूब तशीच अवस्था आज पारवा परिसरातील शेतकèयाची झाली आहे. रोज सकाळी उठून आकाशाकडे पाहायचे, ढग जमा होण्याची वाट पाहायची आणि पाऊस न पडल्यास हताश होऊन घरात परतायचे, अशी बिकट सद्यस्थिती निर्माण झाली आहे. शेतात पाऊस पडला तरच धान्य आणि कापूस पिकणार असल्याने बळीराजाचा पूर्ण जीव आकाशात अडकला आहे.
यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशीम आणि बुलढाणा हा पश्चिम विदर्भाचा भाग मुख्य कापूस आणि सोयाबीन उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जातो. येथील शेतकèयांनी खरीप हंगामासाठी शेतजमिनीची मशागत करून ठेवली आहे. महागडी खते आणि बियाणांची खरेदी करून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. पारवा परिसरासह अनेक भागांत काही शेतकèयांनी उतावीळ होऊन धूळपेरणी देखील उरकली आहे. मात्र, पावसाने पाठ फिरवल्यामुळे ही बियाणे मातीतच सडण्याची भीती निर्माण झाली असून, कापूस उत्पादक बळीराजावर दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट घोंगावत आहे.
यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम विदर्भात उन्हाचा कडाका अद्यापही जाणवत असून परिसरातील विहिरी, कूपनलिका आणि जलप्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. जूनचा पंधरवडा संपत आला तरी मान्सून सक्रिय न झाल्याने केवळ शेतीच नाही, तर ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने पावसाचे अंदाज वर्तवले असले तरी प्रत्यक्षात मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे.
शेतकऱ्यांची आर्त हाक :
मिरुग लागून आठ दिवस झाले तरी पारवा आणि संपूर्ण पश्चिम विदर्भात पावसाचा पत्ता नाही. आधीच कापूस-सोयाबीनच्या भावाने शेतकरी खचला आहे, त्यात आता निसर्गाची साथ मिळत नसल्याने कापूस उत्पादक पट्ट्याचे आर्थिक गणित कोलमडेल, अशी आर्त भावना स्थानिक शेतकèयांनी व्यक्त केली आहे. आता केवळ आणि केवळ वरुणराजाच्या कृपेवरच विदर्भातील खरीप हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे.