- महामार्ग पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांची माहिती
अनिल कांबळे
नागपूर,
Lohit Matani नागपुरात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन यू-टर्न’ या यशस्वी उपक्रमाची व्याप्ती आता राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वाढविण्यात येत आहे. महामार्गांवरील अपघात व मृत्यू कमी करण्यासाठी महामार्ग सुरक्षा पोलिस, नागपूर परिक्षेत्रातर्फे व्यापक आणि परिणामकारक मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच अपघातांचे मूळ कारण शोधणे, ब्लॅक स्पॉट्सचे वैज्ञानिक विश्लेषण करणे, अपघातप्रवण क्षेत्रांची ओळख पटविणे आणि तातडीच्या सुधारणा सुचविणे यासाठी नागपूर पोलिसांच्या धर्तीवर नागपूर परिक्षेत्रात स्वतंत्र ‘अपघात विश्लेषण कक्ष’सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती महामार्ग सुरक्षा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गावर तीन वर्षांमध्ये १७९ जणांचा अपघाती मृत्यू झाला. यापैकी गेल्यावर्षी २८ प्राणांतिक अपघातांमध्ये ३३ जण दगावले. चालू वर्षात २३ अपघातांमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. या महामार्गावर २०० किलोमिटरपर्यंत विश्रांतीची सोय नाही. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी समृद्धीवर दर ५० किलोमिटरला विश्रांती मार्ग तयार केला जात आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. नागपूर परिक्षेत्रातील महामार्गांवर २०२३ मध्ये ९७१ जणांचा मृत्यू झाला होता. प्रतिबंधात्मक उपाय, ब्लॅक स्पॉट सुधारणा आणि संयुक्त मोहिमांमुळे २०२५ मध्ये हा आकडा ६५७ पर्यंत घसरला. दोन वर्षांत सुमारे ३२ टक्के घट झाली मात्र, चालू वर्षात मृत्यूंची संख्या ३०४ कायम आहे. अतिवेग, मद्य प्राशन, हेल्मेटचा अभाव आणि चुकीच्या ठिकाणी वाहने उभी करणे ही मृत्यूची प्रमुख कारणे आढळली आहेत. येणाऱ्या काळात हे अपघाती मृत्यू १५ टक्के कमी करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी पंचसूत्रांवर काम केले जात आहे, असेही मतानी यांनी स्पष्ट केले.
----------
“रस्ते सुरक्षित बनविण्यासाठी केवळ पोलिस यंत्रणा नव्हे तर प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी महत्त्वाची आहे. वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादेचे पालन आणि मद्यपान करून वाहन न चालविणे या चार गोष्टींचे पालन केल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळता येऊ शकते,” असे आवाहन पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी केले.
— लोहित मतानी (पोलिस अधीक्षक)