एकाच महिन्यात १२,८७४ वाहनचालकांवर कारवाई

अमरावती ग्रामीण पोलिसांचा अपघातमुक्त जिल्ह्यासाठी पुढाकार

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
अचलपूर, 
action-against-motorists : रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि गंभीर जखमींचे प्रमाण कमी करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिस दलाने वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीला अधिक गती दिली आहे. जून २०२६ या एकाच महिन्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १२ हजार ८७४ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात आली. ही मोहीम पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी दिली आहे.
 
 
 
action-against-motorists
 
 
 
पोलिस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत जिल्हा वाहतूक शाखा, अचलपूर वाहतूक शाखा तसेच अमरावती ग्रामीणमधील ३१ पोलिस ठाण्यांच्या वाहतूक पथकांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत हेल्मेट न घालणाऱ्या १,८२९, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या १०८, ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या २१७, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २१, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या २४, चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्या २४३, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५,७६३, फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या १८६, वाहतूक सिग्नल तोडणाऱ्या ३३४ वाहनचालकांसह अन्य नियमभंग करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली.
 
२२ जूनपासून अमरावती ग्रामीणमधील सर्व ३१ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चालकांसह मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू असून, प्रत्येकाने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील प्राणघातक अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिस आणि महामार्ग पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ठिकाणी विशेष नाकाबंदी करण्यात आली आहे. यामध्ये ८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ८ ठिकाणी आणि अपघातप्रवण ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील १९ ठिकाणी तपासणी सुरू आहे. पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या मोहिमेचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून अपघात व अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करणे हा आहे.