अनिल कांबळे,
नागपूर,
daughter-to-get-job : मुलीच्या लग्नानंतरही तिला वडिलाच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यास पात्र आहे. त्यामुळे केवल मुलगी विवाहित आहे, या कारणावरून अनुकंपा तत्त्वावरील नोकरी नाकारू शकत नाही. असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. या कारणावरून वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोलि)ने केलेला अर्जाचा नकार रद्द करत संबंधित महिलेच्या अर्जाचा दोन महिन्यांत नव्याने विचार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
न्या. वाय.जी. खोब्रागडे आणि न्या. सुशील घोडेस्वार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. चंद्रपूर येथील वेकोलिमधील मृत कर्मचाऱ्याची विवाहित मुलगी तनुजा झाडे हिने अनुकंपा नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र, ती विवाहित असल्याचे कारण देत १० एप्रिल २०२५ रोजी वेकोलिने तिचा अर्ज फेटाळला. या निर्णयाविरोधात तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
सुनावणीदरम्यान वेकोलितर्फे कंपनीच्या धोरणानुसार विवाहित मुलगी अनुकंपा नियुक्तीस पात्र नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, न्यायालयाने ‘आशा पांडे विरुद्ध कोल इंडिया लिमिटेड’ तसेच ‘मंदाकिनी विठोबा पोळे’ आणि ‘खुशबू सागर चौतेल’ या प्रकरणांतील पूर्वीच्या निर्णयांचा आधार घेत हा मुद्दा आधीच निकाली निघालेला असल्याचे स्पष्ट केले.
न्यायालयाने निर्णयात नमूद केले की, विवाहित मुलीला केवळ विवाहाच्या कारणावरून आश्रितांच्या व्याख्येबाहेर ठेवणे हे भेदभावपूर्ण आहे. त्यामुळे अशा कारणावरून अर्ज नाकारण्याचा अधिकार नियोक्त्याला नाही. यामुळे वेकोलिचा १० एप्रिल २०२५ चा आदेश रद्द करून संबंधित महिलेच्या अर्जाचा इतर सर्व पात्रता निकषांच्या आधारे दोन महिन्यांत नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. मात्र, अर्जाचा विचार करताना ती विवाहित आहे, हे नकाराचे कारण देता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.