अनिल कांबळे,
नागपूर,
pre-wedding-photoshoot : प्री-वेडिंग फोटोशूटचे काम देण्याच्या बहाण्याने नागपुरात आणलेल्या फोटोग्राफरचे ६ लाख ६० हजार रुपयांचे कॅमेरा साहित्य आणि मोबाईल चोरीला गेल्याची घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
मुरलीधर रेड्डीनायक घुगलावत (४०, रा. मामड, तेलंगणा) हे फोटोग्राफी व्यवसाय करतात. त्यांचा मित्र मोहन सागर याच्या माध्यमातून त्यांची कार्तिक चौधरी अक्कीनेनी (४६, रा. चेलपूर, आंध्र प्रदेश) याच्याशी ओळख झाली होती. कार्तिकने प्री-वेडिंग फोटोशूटचे काम देण्याच्या बहाण्याने मुरलीधर यांना नागपुरात बोलावले. सोमलवाडा येथील एका हॉटेलमध्ये दोघेही एकाच खोलीत थांबले होते. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुरलीधर झोपेत असताना कार्तिकने त्यांच्या बॅगेतून ॲपल आयफोन १७ प्रो मॅक्स, ओप्पो एफ२१ मोबाईल, सोनी आर४ कॅमेरा, कॅनन आर६ कॅमेरा लेन्ससह अन्य आठ लेन्स असा एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शेषराव येवलेकर यांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सोनेगाव पोलिस त्याचा शोध घेत आहेत.