अमरावती
school buses and vans शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावतीच्या सर्व तपासणी पथकांमार्फत अमरावती शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
जून महिन्यापासून सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत आतापर्यंत जवळपास ६५० स्कूल बसची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आढळून आलेल्या १६५ स्कूल बस कारवाई करून शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ४५ वाहनांना जप्त करण्यात आले. यामध्ये अवैध पद्धतीने शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या २३ वाहनांचा समावेश आहे.
शाळा व्यवस्थापन, वाहनमालक, चालक तसेच पालकांनी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी नियमांचे पालन करणारी व सुरक्षित वाहतूक व्यवस्था असलेली वाहनेच वापरावीत. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा असुरक्षितता आढळल्यास संबंधितांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक आवश्यक
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करताना वाहनांची वैध कागदपत्रे, फिटनेस, परवाना, सुरक्षिततेशी संबंधित आवश्यक बाबी तसेच विद्यार्थी वाहतुकीसाठी लागू असलेल्या नियमांचे पालन याबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच अवैधरीत्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई सुरूच राहील.
-उर्मिला पवार
प्रादेशिक परिवहन अधिकारी