तभा वृत्तसेवा
चंद्रपूर
ganapati utsav महाराष्ट्राचे लाडके दैवत श्री गणरायाच्या आगमनाची वर्षभर आतुरतेने वाट पाहणार्या भाविकांची प्रतीक्षा संपली. सोमवार, 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला अगदी ढोल-ताशांच्या गजरात, अत्यंत उत्साहात व मोठ्या भक्तीमय वातावरणात बाप्पाचे आगमन झाले. सकाळी घरोघरी गणरायाच्या आगमनाची धावपळ होती. तर सायंकाळपर्यंत मंडळाचे गणपती वाजत गाजत आले.

सकाळपासूनच शहरातील चांदा क्लब मैदान, छोटा बाजार, हिंदी सिटी हायस्कूल, रघुवंशी काम्प्लेक्सजवळ तसेच तुकूम भागात घरगुती आणि मंडळाचे गणपती नेण्यासाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती. मागील वर्षीच्या तुलनेत गणेश मूर्तीच्या किंमतीत वाढ झाली असली, तरी भाविकांच्या उत्साहात कमतरता दिसून आली नाही. सायंकाळी सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’च्या घोषणा देत, ढोल-ताश्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात बाप्पाला मंडपात विराजमान केले. दिवसभर शहरात चतुर्थीसाठी लागणार्या पुजेच्या साहित्यविक्रीची सर्वत्र रेलचेल होती. नागरिक प्रसादासाठी साखरफुटाणे, बत्तासे, पेढे, मोदक, फुलांचे हार आदींची खरेदी करीत होते. तसेच गोल बाजारात सजावटीसाठी लागणार्या सिंहासन, तोरणे, चक्र, झुंबर, दिव्यांच्या माळा आदी दुकानातही नागरिकांनी गर्दी केली होती.
घरगुती गणरायाचा मुक्काम हा दीड दिवस, तीन दिवस, कुठे पाच दिवस, तर कुठे दहा दिवसही असतो. मात्र, मोठ्या मंडळातील गणपतींचा मुक्काम दहा ते अकरा दिवसांचा असतो. हा दहा दिवसांचा मुक्काम प्रत्येकांसाठी वर्षभराचा आनंद आणि ऊर्जा देवून जातो. केवळ हिंदूच नव्हे, तर सर्वच धर्मातील नागरिक या उत्साहात सहभागी होतात आणि गणेशाची मनोभावे पूजा-अर्चा करतात. यातून धार्मिक एकोपाही जपला जातो. मंगलभाव जागृत करणारा, जगण्याची नवी उमेद देणारा, घर आणि वातावरण प्रसन्न करणारा असा हा महोत्सव आहे. पण आता त्याचे स्वरूप बदलत आहे. मात्र, उत्साह कायम आहे. गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंतचे पुढचे दहा दिवस महानगरात भक्तीमय वातावरण असणार आहे. घराघरांपासून, तर रस्त्यावरच्या मंडपापर्यंत रोषणाई, जास्वंदांच्या माळा, मोदकांनी भरलेली ताटं, अत्तराचा दरवळ आणि मंत्रोच्चारांनी अवघी नगरी भक्तीरसात बुडून जाणार आहे.
मूर्ती विसर्जनासाठी 25 कृत्रिम तलाव
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्यादृष्टीने 25 कृत्रिम तलाव व 25 निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली असून, सर्व घरगुती व लहान मूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी झोननिहाय 3 फिरत्या विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. या फिरत्या विसर्जन कुंडांचे झोननिहाय मार्गक्रमण वेळापत्रक आणि संपर्क क्रमांकदेखील महापालिकेद्वारे देण्यात आले आहेत.