कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा वाढता धोका

संकटानंतर मोठे संकट

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
कुऱ्हा
cotton-crops  आधी पावसाचे संकट, नंतर दुबार पेरणी, मजूर समस्या, त्यानंतर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव, त्यात भेसळ खते आणि बियाणे, यातच आता नवीन संकट म्हणजे बोंडअळी वाढण्याची शक्यता दिसत आहे. तिवसा भागात दरवर्षी कापूस पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, पण बोंडअळीची समस्या आणि मजुरांच्या समस्येमुळे कापसाचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर उपाययोजना करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, एकात्मिक कीड व्यवस्थापन जैविक पद्धतीने करणे आवश्यक आहे.
 
cotton
विदर्भात कापसाचे पीक सध्या पात्या, फुल, बोंड अवस्थेमध्ये असल्याने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच शेतात कामगंध सापळ्यांचा वापर करणे फायद्याचे ठरणार आहे. कापूस पिकातील गुलाबी बोंडअळी सुरुवातीला पांढुरक्या रंगाची असून, पूर्ण वाढ झाल्यानंतर ती गुलाबी रंगाची होते. ती फुले आणि हिरव्या बोंडांमध्ये शिरून नुकसान करते. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसत असल्याने त्यांना ‘डोमकळी’ म्हणतात. अळी बोंडात शिरल्यानंतर प्रवेशाचे छिद्र स्वतः बंद करते. त्यामुळे बाह्य निरीक्षणातून प्रादुर्भाव सहज लक्षात येत नाही. अळी बोंडातच वाढ पूर्ण करून बाहेर पडताना छिद्र करते. त्यामुळे कापूस पिकातील सरकी बीजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कापूस किडक तयार होतो. प्रतवारी घटते. परिणामी बोंडे अकाली फुटतात,
 
कापसाची प्रत खालावते आणि सरकीचे नुकसान होते. त्याचा परिणाम बियाणांची उगवणशक्ती आणि तेलाच्या प्रमाणावरही परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर पीक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून किमान एक फूट उंचीवर एकरी पाच ते सहा कामगंध सापळे निरीक्षणासाठी लावावेत. मोठ्या प्रमाणावर नर पतंग पकडण्यासाठी एकरी १५ ते २० सापळे वापरावेत. सापळ्यांतील ल्यूर ४५ दिवसांनी बदलणे आवश्यक आहे, यासह अन्य सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.