वरोडा
mla karan deotale तालुक्यातील बोडखा (मोकाशी ) येथे मागील 8 दिवसांपासून तीन पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. वाघाने कुंडलिक कामडी यांच्यावर हल्ल्यासह दोन पशुपालकांच्या बकर्या गंभीर जखमी केल्या. तसेच बोडखा, पवनगाव लगत विशाल मून यांच्यावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यामुळे बोडखा परिसरातील शेतकरी, शेतमजूर भयभित झाले असताना वनविभागाचे अधिकारी वाघाच्या हालचालीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत बोडखा ग्रामवासी थेट आमदार करण देवतळे यांच्या घरी धडकले.
यावेळी आ. देवतळे यांच्या सोबत ग्रामवासियांनी संवाद साधला. आ. करण देवतळे यांनी वनविभागाच्या अधिकार्यांना तातडीने घरी बोलावून थेट बैठक घेत वाघाचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. तसेच ग्रामस्थांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निवासस्थानी जाऊन संपर्क साधला.
खासदार व आमदार यांनी मुख्य वन निरीक्षक यांना तात्काळ मेलद्वारे निवेदन पाठविले. लोकप्रतिनिधींच्या ई-मेलची दखल घेत चंद्रपूर व वरोडा वनविभागाच्या अधिकार्यांनी बोडखा गावात पोहचून वाघाचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी रेंजर मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली टेमुर्डा वनविभागाचे अधिकारी चव्हाण व वनरक्षक महाकुलर व त्यांच्या संपूर्ण चमूने बोडखा शेतशिवार पिंजून काढत कॅमेरे लावले. वाघाची हालचाल कळताच जेरबंद करू, अशी प्रतिक्रिया वनविभागाच्या अधिकार्यांनी दिली. याप्रसंगी बोडखा मोकाशी या गावाला वनविभागच्या योजना मिळाव्या, अशी मागणी गावाकर्यांनी निवेदनातून केली.